prashansa-breadcum

।। शुभेच्छा ।।

होम /
shiv-logo

भाई... आयुष्यातील या सुखद वाटेवरून जाताना, प्रत्येक भेटलेली व्यक्ती आम्हांला विचारते हो ! काय करतोस ? कुठे कामाला आहेस ? त्यावेळी आम्ही अभिमानाने सांगतो. शिवसह्याद्री ! भाई हा समाज असो अथवा कुटुंब आज आम्ही समाधानी आहोत. शिवसह्याद्री मध्ये भाईं सारखे नेतृत्व लाभले.
सद्गुरु सारखा पाठीराखा लाभला.
भाई आमच्या जीवनात शिवसह्याद्री आली नसती तर ? या प्रश्नासरशी सर्वत्र अंधार दिसू लागतो. नोकरी मिळाली असती, पण आज आध्यात्माचे बाळकडू पाजून, सत्कर्म घडवून जीवनातल्या वाटेवरची योग्य दिशा मिळाली नसती. जीवन कुठे तरी भरकटत राहिले असते. स्वताचे अस्तित्व आम्ही हरवून बसलो असतो. आज या परिवारात एकविचाराने एकजुटीने कामाला लागलो, हीच आमुची कर्मभूमी झाली.
आम्ही शेतकरी कुटुंबातील... हातात परिश्रमाचा नांगर तर आहेच आणि पाठीवर भाईंच्या विश्वासाचा हात आहे. प्रामाणिकपणे व निष्ठेने वागल्यावर उद्याचे उज्वल भविष्यही आमच्या हातात आहे. शिवसह्याद्रीने आर्थिक सक्षम बरोबर मानसिक सुख दिले. भाईंसोबत सत्कर्मात सहभाग घेवून, आज मुंबईसारख्या ठिकाणी स्वमालकीचे घर बनले आहे. भाई वैयक्तिक, आर्थिक व कौटुंबिक अडचणी ही सोडवतात. आज प्रत्येकाला विचारले तर तो भावणूक होवून सांगेल भाई... आमचे भाई... अगदी छोट्या छोट्या समस्या ही ते सोडवतात. योग्य सल्ला देतात. दुखाचे डोंगर कोसळू दे भाईंच्या छत्रछायेत माणूस डगमगत नाही. भाई सत्कर्माची आस लागली आमच्या आयुष्याचा श्री गणेशा झाला. वारकरी संप्रदाय जोपासल्याने लोकांच्या बघण्याचा दृष्टीकोन बदलला. समाजामध्ये आदराने नांव घेतले जाते. त्यापाठीमागे उभी आहे फक्त शिवसहयाद्री आणि शिवसह्याद्री ! भाई आपण प्रत्येकाच्या कलागुणांना वाव दिला संस्थेचे विविध उपक्रम इंग्लिश मिडयम स्कूल व ज्ञानश्री इंजिनिअरिंग महाविद्यालय. शैक्षणिक क्षेत्र ही खूले करून दिले. आमच्या भावी पिढीचेही कल्याण केले.-
आज आम्ही रौप्य महोत्सव सारखे सण साजरे होत असताना पाहत आहे . याही पुढे असे अनेक येणारे आनंद महोस्तव असेच पाहू. भविष्यात सेवा कालावधी पूर्ण झाला तरी नाते अतूट राहील. श्वासाची माळ तुटली तरी कर्तुत्वाच्या ध्यासाची तुटणार नाही. कुटुंबासाठी सहारा आणि शेवटचा निरोप देणाराही हाच परिवार. जन्माला आलो त्यावेळी काही घेवून नाही आलो पण उद्या मृत्युनंतर जाताना हीच आयुष्यातील मोठी मिळकत सोबत राहील. भावनेच्या भरात काही जास्त लिहिले असल्यास क्षमस्व !

- भाई..... आपला निष्ठावंत सेवक वर्ग


pro-img1

एकसष्ठी सोहळ्याप्रीत्यर्थ श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे (भाई) यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद.
हा शुभाशीर्वाद देताना मला अत्यंत आंनद होत आहे. पांडुरंगाने त्यांच्यावर पहिली कृपा केली ती म्हणजे त्यांना सातारकरांच्या वारकरी परंपरेत आणलं आणि ते वारकरी झाले. दुसरी कृपा अशी की, शिवसह्याद्री व सातारा बँकेची धुरा वाहत असताना ते सहकार क्षेत्रामध्ये एका वेगळ्या उंचीवर जाऊन बसले. त्यांनी त्या ठिकाणी आपले अढळ स्थान निर्माण केले आणि ते सरकारश्री झाले. आणि तिसरी कृपा केली ती अर्थकारण करत असताना त्यांना समाजकारण करण्यास प्रवृत्त केले. सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते शिक्षण क्षेत्रात ज्ञानश्री झाले.
भगवान भक्त नाथांनी एका ओवीत म्हटले आहे -
वये धन श्रेष्ठ पण । ते श्रेष्ठत्व अति गौण ।।
पण भगवंत प्रति श्रेष्ठ जाण । ते अति उत्तम उद्धवा ।।
म्हणून भाईंच्या अंतरंगामध्ये जशी भगवंताची श्रद्धा आहे, तशीच गुरुपरंपरेची सुद्धा श्रद्धा आहे. आणि ती तशीच यापुढे राहील यात शंकाच नाही.
आणि म्हणूनच भाईंच्या यापुढील आयुष्य निरोगी, सर्वांगीण समृद्ध होवो, हाच गुरुघरातून आशीर्वाद आणि शुभेच्छा..

- ह.भ.प.प.पू. बाबामहाराज सातारकर


pro-img2

श्रीमान आदरणीय भाईंना एकसष्टीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !!
सज्जनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नितळ गावी जन्माला आलेले नितळ आणि सज्जन व्यक्तिमत्व म्हणजे भाई !! आपले जीवन शहाळ्यासारखे आहे. वर विशाल कर्तुत्वाचे अभेद्य कवच, आत सज्जनतेची मवाळ मलई आणि त्या आत नितळ स्वभावाचे स्वच्छ, मधुर पाणी !!!! थोडे देणाऱ्यास बहु देण्याचा स्वभावही त्या कल्पवृक्षाचाच !!!!!
सातारा बँक व शिवसह्याद्रीकडे तर सैन्यातील कर्तृत्ववान मुलाकडे झुबकेदार मिशावाल्या बापाने अभिमानाने बघावे तसा सह्याद्री पाहतोय !!!
आपल्यावर भगवंताची व संतांची कृपा व्हावी व आपल्या कर्तुत्वाच्या देशकालाच्या मर्यादा निवृत्त व्हाव्यात ही शुभकामना !!!

- चैतन्य भानुदासमहाराज देगलूरकर


pro-img3

    महाराष्ट्राच्या सहकार आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणारे प्रेममूर्ती श्री ज्ञानेश्वर बापूसाहेब वांगडे तथा आदरणीय भाई आज आपल्या वयाची साठ वर्ष पूर्ण करून ती एकसष्टीत पदार्पण करीत आहेत. याचे औचित्य साधून भाईंचा एक भव्य कार्यगौरव सोहळा व्हावा आणि त्यांच्या जीवन चरित्राचा ग्रंथ प्रकाशित व्हावा अशी अनेक चाहत्यांची प्रांजळ इच्छा. अशा स्वरूपाच्या ग्रंथ व्हावा, ही गोष्ट माझ्याही मनात सुवर्ण महोत्सवपासून घोळत होती. ती सर्व स्नेही मंडळीच्या मुखातून प्रकट झाली.
    मा.भाईंची आणि माझी ओळख सहकार क्षेत्रातील माझे स्नेही अभयलक्ष्मी सरकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. भानुदास जाधव आणि माझे अनुयायी श्री. कृष्णा शिवराम खंडागळे यांच्यामुळे झाली. पुढे या ओळखीचे रुपांतर प्रगाढ स्नेहात झाले. त्यातील अकृत्रिमता आजही अखंड आहे. या तीन दशकांत मी भाईंचे जीवन जवळून पाहिले आहे, अभ्यासले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे काय असते, त्यांचे भाई हे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे लागेल. वय वाढत जाते, प्रतिवर्षी वाढदिवसाचे सोहळे होत जातात, मात्र हे सोहळे कालांतराने विस्मृतीच्या पक्षात जातात. अक्षरे ही कायम असतात. यास्तव चरित्रग्रंथ करण्याचे निश्चित झाले. मात्र भाईंचे जीवन प्रसिद्धीपासून चार कोस दूर असणारे आहे. ते परवानगी देतील का ? हा प्रश्न मोठा होता. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी परवानगी दिली.
   मा. भाईंचे जयषठ बंधू आदरणीय श्री. चंद्रकांत बापूसाहेब वांगडे यांनी सारी माहिती संकलित करून लिहावे आणि संपादनाची सर्व जबाबदारी समितीने माझ्यावर टाकली. संपादन क्षेत्रातील तुटपुंज्या ज्ञानावर ही जबाबदारी मला पेलवता येईल का ? हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. माझ्या पारमार्थिक वाटचालीतील मा. भाईंचे खूप मोठे योगदान लाभले आहे. जयषठ बंधूप्रमाणे ते माझ्या पाठीशी सतत उभे राहिले आहेत. या ऋणानुबंधच्या नात्यातून ही संपादनाची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली.
    'सहकार पंढरीचे वारकरी' भाई हा काही भाईचा आत्मचरित्र ग्रंथ नाही. मा. दादा यांनी त्यांच्या जीवनपटावर लिहिलेल्या लोकसंग्रह आहे. या सर्व प्रकरणातून मा. भाईंचा जीवनपट उलगडत जातो. तसे पाहू जात भाईंचे कार्य व्यापक आहे. विस्तारपूर्वक लिखाण केले असते तर या पुस्तकाचे काही खंड करावे लागले असते. मात्र दादांनी संक्षेपाने उत्तमरित्या मांडले आहेत. वाचकांना ते वाचताना त्यांचा अनुभव येईल. या पुस्तकांच्या निर्मितीमध्ये अनेकांचे हात लागले आहेत. जे सारे भाईवर प्रेम करणारे आहेत. त्यांना ऋणनिर्देश करणे त्यांना आवडणारही नाही. स्तुती करण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडण्यात मला आनंद होईल.
या पुस्तकांकरिता संकलन आणि लिखाण दादांनी केले, त्यांचे आभार मानावेत असे आमचे कृत्रिम संबंध नाहीत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ छपाईची जबाबदारी समर्थपणे पेलणारे माझे जिवलग स्नेही माऊलीभक्त श्री. विनीत सबनीस यांचे आभार मानता येणार नाहीत. जिवलगाचे आभार कसे मानणार ? ग्राफिक प्रिंटर्सचे मालक मा. श्री. मंगेशजी वर्तक यांनी अक्षर जुळणी व मुद्रण सहकार्याचे काम उत्कृष्टरीत्या आणि कमी वेळात करून दिले. तसेच या पुस्तकाची मुद्रित तपासने अवघड जबाबदारी श्री. जगदीश भोवड यांनी सांभाळली.या दोघांचाही ऋणनिर्देश केला पाहिजे. या ग्रंथ निर्मितीत श्री. प्रताप वांगडे, कृष्ण खंडागळे, अजय निकम, सुधीरपंत पाटील, वसई यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे कौतुक करतो. एका जेष्ठ तपस्वी व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणार्‍या पुस्तककरिता मी सांगेन ती जबाबदारीची कामे चि. स्वप्निल पिंपळे, निळोबा गोरठाणकर, राहुल नाईक, जयेश नाईक, लौकिक ठाणगे, श्रीकांत खंडाळे यांनी पार पाडली. या सर्व विद्यार्थ्यांना मंगल आशिर्वाद प्रदान करतो. त्यांच्याकडून भविष्यात अक्षरांची सेवा घडत राहावी.
    कर्तृत्वसंपन्न माणसाची जीवन चरित्र पुढील पिढीला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत असतात. या पुस्तकाच्या वाचनाने पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, जीवनाला योग्य दिशा लाभावी, या हेतूनेच ही अक्षरे गुंफली आहेत. सर्वांनी या ग्रंथ वाचण्याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
आपला विनित

- प्रमोद पुरुषोत्तम जगताप (सुपेकर)


prashansa

काय म्या पामरे बोलावी उत्तरे । परी विश्वंभरे बोलविले ।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । परि बोलाविता धनी वेगळाचि ।।
    या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे आज माझी अवस्था झाली आहे. आमच्या वांगडे घराण्याच्या कर्तबगार पुरुषांच्या यादीतील सांप्रत काळातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे माझे कनिष्ठ बंधू, माऊलीप्रसाद श्री. ज्ञानेश्वर बापूसाहेब वागंडे ऊर्फ भाई.
    भाईंच्या एकसष्टीच्या निमित्ताने एक जीवनचरित्र ग्रंथ प्रकाशित व्हावा आणि त्यांचे संकलन आणि लिखाण करण्याची जबाबदारी समितीने माझ्यावर सोपवली. हिमालय एवढे मोठे हे काम माझ्यावर टाकले. मी जरी वयाने मोठा असलो तरी भाईंनीच माझ्या जीवनाला आकार दिला आहे. आमच्या वांगडे घराण्याच्या सात पिढ्यात आजही कधी विभक्तपणा शिवला नाही. सारे काही अभेदाचे वातावरण.हृदया हृदय एक झाले असे.
    मी माझ्या पद्धतीने ही अक्षरांची जुळणी केली, मात्र याच्यावर ह.भ.प.श्री. प्रमोद महाराज यांना संस्कार केले. या ग्रंथाचे सारे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. संपादनाचे प्रमुख कार्य महाराजांनी भाईंवरील प्रेमापोटी केले. आमच्या वांगडे परिवाराचा आणि प्रमोद महाराजांचा एक अतुट असा रेशीमबंद आहे. त्यातून हे पुस्तक साकारले. या पुस्तकाचा सर्व वाचकांनी कृपावंत होऊन स्वीकार करावा एवढीच विज्ञापना. संतश्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात मी एवढेच म्हणेन -
    तरी न्यून ते पुरते । अधिक ते सरते ।।
    करोनि घ्यावे हे तुमते । विनवितु असे ।।

- चंद्रकांत बापूसाहेब वांगडे